सांगली: जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या संपामुळे १ लाख ३४ हजार बालकांचा नियमित आहार थांबला आहे. त्यामध्ये असलेल्या ३९३ कुपोषित बालकांनाही याचा फटका बसला आहे. तसेच ११ हजार ६३८ गर्भवती आणि १२ हजार ८५४ स्तनदा मातांचा आहारही थांबला आहे. पोषण आहाराविना बालके व माता यांचे हाल सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात २७८२ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी २ हजार ७८२ सेविका आणि २ हजार ३५४ मदतनीस आहेत. त्यापैकी १३१ सेविका आणि ३७१ मदतनीस कामावर परतल्या आहेत. मात्र २ हजार ६५१ सेविका आणि १ हजार ९८३ मदतनीस त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे अद्यापही सुमारे २ हजार ३३२ अंगणवाड्यांना कुलूप आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना तुटपुंजे मानधन मिळते. मिळणाऱ्या मानधनावरच अनेकांचा संसार चालतो. त्यामुळे कामाची व्याप्ती लक्षात घेऊन किमान जगण्यापुरते मानधन देण्याची मागणी होत आहे.
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे पोषण आहार वाटप ठप्प आहे. जिल्ह्यात १ लाख ३४ हजार बालके आहारासाठी पात्र आहेत. त्यापैकी ३९३ बालके तीव्र कुपोषित आहेत. या सर्व बालकांना अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने दररोज पूरक पोषण आहार दिला जातो. मात्र बहुसंख्य कर्मचारी संपावर ठाम असल्याने आहाराचे वाटप थांबले आहे. याचा बालकांच्या आहारावर परिणाम झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाने याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करून सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.