![]() |
Vishal Patil |
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी मान्य केली, सांगलीतील दत्त इंडिया (वसंतदादा), दालमिया कारखान्याने संघटनेच्या मागणीला हिरवा कंदील दाखविला, अशी माहिती संघटनेने दिली. त्यामुळे कोल्हापुरातील आणि जिल्ह्यातील दोन कारखान्यांना जे जमतं, ते इतर कारखान्यांना का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात ६० ते ६५ टक्के उसाचे क्षेत्र आहे. १५ साखर कारखाने आहेत, यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण चालते. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप अशा सर्वच पक्षांतील नेत्यांची कारखान्यांवर पकड आहे. याच कारखान्यांतून निघणाऱ्या मलईतून अनेकांनी विविध पदांची चव चाखली आहे, चाखत आहेत, काही कारखान्यांत अध्यक्ष हा नावापुरताच असतो, चालवणारा धनी वेगळाच असतो, हे उघड सत्य आहे, निवडणुकीत कारखान्यांच्या यंत्रणेचा किती वापर केला जातो, हे सर्वश्रुत आहे.
जिल्हाधिकारी यांनी सोमवारी बोलाविलेल्या बैठकीला विशाल पाटील वगळता कोणत्याही कारखान्याचे अध्यक्ष उपस्थित नव्हते. त्यानंतर प्रशासन,कारखान्यांचे प्रतिनिधी आणि संघटनेच्या बैठकीत इंडियाचा तोडगा निघाला व दत्त इंडिया कारखाना आणि स्वाभिमानीमध्ये रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी एफआरपी अधिक १०० रुपये देण्याचे मान्य केले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतले.