![]() |
महाविकास आघाडीचे लोकसभा जागावाटपावर शिक्कामोर्तब |
महाराष्ट्रातील लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीत सुरू असलेला तिढा दिल्लीत झालेल्या बैठकीत जवळपास संपला आहे. या बैठकीत शिवसेना सर्वाधिक जागा लढणार, तर काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या जागा लढणार असे ठरल्याचे समजते.
या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा क्षेत्राबाबत स्वतंत्र चर्चा झाली. यामध्ये शिवसेना सर्वाधिक जागा लढणार, तर काँग्रेस-राष्ट्रवादी सारख्या जागा लढणार, असेही ठरल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसने १४ जागांची मागणी केली आहे. यापैकी दोन-तीन जागा कमी होऊ शकतात. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा काही जागा जास्त लढण्याची शक्यता आहे.
काही मतदारसंघ यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होते; मात्र अजित पवार गट वेगळा झाल्यामुळे जिथे ताकद नाही त्या जागा अदलाबदल केल्या जाणार आहेत. या समीकरणानुसार २०१९ ला राष्ट्रवादीने लढलेल्या मावळ, भंडारा, गोंदिया, रायगड या जागा मित्रपक्षांकडे जाणार आहेत. इतर पक्षांच्याही काही जागांमध्ये अशा पद्धतीने बदल होऊ शकतो.
मुंबईसह कोकणात शिवसेना अधिक जागा लढेल, तर विदर्भात काँग्रेस अधिक जागा लढणार आहे. राज्यातील काही आमदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. यामध्ये राज्यातील बडे चेहरे असण्याची शक्यता आहे.
या बैठकीला काँग्रेसच्या राष्ट्रीय आघाडी समितीचे मुकुल वासनिक, अशोक गेहलोत, सलमान खुर्शीद, मोहन प्रकाश यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने संजय राऊत, विनायक राऊत उपस्थित होते.
अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.