भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
पुणे : शरद पवार यांना शिवसेना-भाजप युती तोडायची होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना त्यांना जे जमले नाही, ते त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून केले. त्यांना युती तोडण्यात यश मिळाले आहे. आता शरद पवार व काँग्रेसच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची उपयुक्तता संपली आहे. विधानसभा निवडणुकीत ते उद्धव ठाकरे यांना फिरवतील, त्यांची भाषणे घेतील. मात्र, पुन्हा मुख्यमंत्री करणार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी पुण्यातील एका हॉटेलमध्ये शहरातील इच्छुकांची बैठक घेतली. त्यांची समजूत काढण्यासोबतच काहींना सज्जड दमही दिला. बैठक उरकून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे असताना शरद पवार जे करू शकले नाहीत, ते त्यांनी उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून केले. पवारांना त्यांच्या मुलीला-सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे आहे.त्यामुळे विधानसभेला उद्धव ठाकरेंना फिरवतील, त्यांची भाषणे होतील. मात्र, त्यांना मुख्यमंत्री करणार नाहीत. उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट आहे. त्यांचा दसरा मेळावा हास्ययात्रा होती. त्यांची परिस्थिती शोलेमधील जेलरसारखी झाली आहे.
महायुतीत ९० टक्के जागांवर एकमत
महायुतीचे ९० टक्के जागांवर एकमत झाले आहे. दहा टक्के जागा बाकी आहेत. मी जागावाटपासाठी नव्हे, तर निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी दिल्लीला जात आहे. कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागणे, यात काहीही गैर नाही. मात्र, एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संबंधिताने उमेदवारी अर्ज भरला तर त्याला बंडखोर म्हणावे लागेल. आम्ही समाज म्हणून नाही तर कर्तृत्व पाहून उमेदवारी देणार आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.