बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण
अमरावती : राज्यात येत्या चार नोव्हेंबरला मोठा राजकीय स्फोट होणार असल्याचे प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हटले असून आम्ही तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत पराभूत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कडू यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याबाबत विचारले असता त्यांनी चार नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार असे सांगितले. ते म्हणाले, महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांनाही जनता कंटाळली आहे. दोन्ही युती- आघाडीत जागावाटपामध्ये तिढा आहे. भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. चार नोव्हेंबरला सगळे चित्र स्पष्ट होईल आणि मोठा राजकीय स्फोट होईल. परिवर्तन महाशक्ती हा स्फोट करणार आहे, असे म्हणत कडू यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला.