तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस तोडणी वाहतूक संघटनेची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत ऊस वाहतूकदारांच्या मागण्यांवर चर्चा झाली. बैठकीत संदीप राजोबा यांनी ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के दरवाढ देण्याची मागणी केली.
यावेळी राजोबा म्हणाले की, सध्या राज्यातील ऊसतोड मजूरांना ३४ टक्के दरवाढ केल्यामुळे प्रतिटन ३६६ रुपये दर झाला आहे. त्याचबरोबर मुकादमास १ टक्के कमिशनमध्ये वाढ झाल्याने प्रतिटन ७३ रुपये मिळणार आहेत. मात्र, वाढती महागाईमुळे ऊस वाहतूकदारांना आर्थिक अडचणी येत आहेत. डिझेल, वाहन दुरुस्ती, ऑईल, टायर्स, मजुरांना द्यावा लागणारा जास्तीचा अॅडव्हान्स, त्यावरील व्याज तसेच दुरुस्तीसाठी मिस्त्री, पंक्चरवाला यांना द्यावी लागणारी मजुरी यांसह इतर व्यवसायासाठी लागणाऱ्या विविध वस्तु मोठ्या प्रमाणात महागल्या आहेत. त्यामुळे ऊस वाहतूकदारांना कर्जेसुध्दा फिटत नाहीत.
राजोबा पुढे म्हणाले की, ऊस वाहतूकदारांना ५५ टक्के दरवाढ न दिल्यास येत्या पंधरा दिवसांत ऊस वाहतूक बंद करण्यात येईल. याबाबत संघटना साखर संघ, राज्य सरकार आणि साखर कारखानदारांच्याकडे मागणी करणार आहे.
या बैठकीत नागेश मोहिते, विठ्ठल पाटील, विनोद पाटील, संदीप मगदूम, श्रीकृष्ण पाटील, गणेश गावडे, पी. एम. पाटील, विजय पाटील, केतन मिठारी, बालाजी पाटील, राजेंद्र भोसले, नवनाथ सूर्यवंशी, अशोक शेजाळ, विलास खराडे, पवन लोहार, नवनाथ सूर्यवंशी, नामदेव पवार, सुनील माने आणि ऊस वाहतूकदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या बैठकीचे निवेदन केंपवड कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी बंडू जगताप यांना देण्यात आले.