![]() |
18 जानेवारीपर्यंत मुदत, अन्यथा मोर्चा |
मिरज महापालिकेने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जनसंपर्क कार्यालय अतिक्रमण ठरवत जेसीबीद्वारे हटविले. यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शहरातील अनधिकृत अतिक्रमणे, कचरा उठाव, औषध फवारणी, पार्किंग व्यवस्था यांसह अन्य प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी महापालिकेला १८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नेते प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी दिला आहे.
जाधव यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेने शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय बेकायदेशीर ठरवत हटवले. मात्र शहरातील इतर अनधिकृत अतिक्रमणे कायम आहेत. मार्केट परिसर, महात्मा गांधी चौक, स्टेशन रोड, हिंदू धर्मशाळा परिसर, सराफ कट्टा, पुजारी चौक यासह विविध ठिकाणी अतिक्रमणे आहेत. धोकादायक इमारती, व्यापारी संकुले, घनकचऱ्याच्या नावावर घरपट्टीमध्ये आकारले जाणारे १ हजार रुपये त्वरित रद्द करावेत. प्रभागात औषध फवारणीच्या नावावर बनावट खर्च केला जात आहे. महापालिकेच्या मालकीच्या शेतजमिनीतून मिळणारे उत्पन्न आणि शहरातील सांडपाणी शेतकऱ्यांना दिले जाते. त्याचे उत्पन्न यांसह अन्य प्रश्नांवर शिवसेनेकडून आवाज उठवला जाईल.
यामध्ये पहिल्या टप्यात अतिक्रमणे, कचरा उठाव, बनावट औषध फवारणी या विरोधात १८ जानेवारी रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना नेते प्रा. सिद्धार्थ जाधव, जिल्हाध्यक्ष संजय विभूते, मिरज शहराध्यक्ष चंद्रकांत मैगुरे, विवेक शिंदे, संजय काटे, दिलीप नाईक, महादेव हलवान, विशालसिंह रजपूत, ऋषिकेश पाटील, बजरंग पाटील, बबन कोळी, संदीप होनमोरे, विराज बुटाले, प्रताप पवार, मयूर घोडके, किरण कांबळे, सरोजनी माळी, सुगंधा माने, सुहाना नदाफ, शाकीर जमादार, मनीषा पाटील, स्नेहल माळी उपस्थित होते.