![]() |
तासगावात अंगणवाडी सेविकांचा थाळीनाद मोर्चा |
तासगाव : शासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करत तासगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी शुक्रवारी पंचायत समितीवर थाळीनाद मोर्चा काढला. कुपोषणाचा सामना करण्यासाठी 48 वर्षे समर्पित सेवा करूनही, अंगणवाडी सेविकांना दहा हजार, मिनी अंगणवाडी सेविकांना साडेसात हजार आणि मदतनीसांचे साडेपाच हजार वेतन कायम आहे. वाढत्या महागाईत एवढे तुटपुंजे वेतन टिकणारे नाही, असे प्रतिपादन प्रदेश उपाध्यक्षा आनंदी भोसले यांनी केले.
थाळीनाद मोर्चादरम्यान गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. संबंधित लाभांसह सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता, अंगणवाडी सेविकांना 26 हजार आणि मदतनीसांना 20 हजार मासिक वेतन, द्विवार्षिक मानधन वाढ, मासिक निर्वाह भत्ता आणि विशिष्ट भूमिकांसाठी नियुक्ती या मागण्यांचा समावेश आहे.
त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा आनंदी भोसले यांनी दिला. निवेदनात सरकारच्या भेदभावपूर्ण वागणुकीवर जोर देण्यात आला आणि अंगणवाडी सेविकांची समाजात महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन योग्य मोबदला देण्याची विनंती केली.