कोकणात यंदा मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पाणी भरलेल्या शेतात पेरणी करणे अशक्य झाले असून, शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर, आमदार भास्करराव जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
कोकणात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पेरणी करणे शक्य होत नाही, तर काही ठिकाणी तयार पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे, असे आमदार भास्करराव जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोकणातील शेतकरी हा या भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या नुकसानीमुळे केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर संपूर्ण कोकणाच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विमा, कर्जमाफी आणि पुनर्वसनासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, पाणी व्यवस्थापन आणि शेती पुनरुज्जनासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचीही गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या कार्यकाळात नेहमीच जनतेच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कोकणातील शेतकऱ्यांच्या या संकटकाळातही त्यांनी तातडीने पावले उचलत सरकारकडे मागणी केली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळेल.