सांगली-मिरजच्या शासकीय रुग्णालयात सुमारे तीनशे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग मंजूर आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ९८ कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे.
शासकीय रुग्णालयाचे कामकाज तीन शिफ्टमध्ये चालते. एका शिफ्टसाठी किमान शंभर कर्मचाऱ्यांची गरज असताना, तीन शिफ्टसाठी केवळ ९८ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे.चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्गाच्या रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवरही परिणाम होत आहे. एक्स-रे काढणे, रुग्णांना एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात हलवणे, रुग्णांना तपासणीसाठी नेणे, स्वच्छता, रुग्णांना जेवण पुरवणे, रुग्णांना माहिती देणे, डॉक्टर, नर्सना मदत करणे आदी कामे जवळपास ठप्प झाली आहेत.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने या रिक्त पदे भरण्यात यावीत, यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली. मात्र, शासनस्तरावर काहीही परिणाम झालेला नाही.शासकीय रुग्णालयातील अडचणींसंदर्भात आंदोलने झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदे भरण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
सरकारी रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांचे आधारवड आहे. या रुग्णालयाला खासगी रुग्णालयांनी तसेच औषध दुकानदारांनी घेराव घातल्यासारखी स्थिती आहे. अशा स्थितीत शासकीय रुग्णालय गरिबांसाठी सुसज्ज ठेवण्याची जबाबदारी कोणाची ? हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय मोरे म्हणाले, की चतुर्थ श्रेणी भरतीबाबत अनेकदा शासनाकडे मागणी करण्यात आलेली असताना, याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत नुकतीच बैठक घेऊन आम्ही शासनाला निवेदन दिले आहे. यापुढे यासाठी आंदोलन उभारण्याची आम्ही तयारी करीत आहोत.
रिक्त पदे भरण्याची मागणी
चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्यावतीने खालील मागण्या करण्यात आल्या आहेत:
शासकीय रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीतील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.
रुग्णसेवेसाठी आवश्यक असलेली साहित्य आणि उपकरणे पुरवण्यात यावीत.
रुग्णांसाठी सुविधा वाढवण्यात याव्यात.
शासनाने या मागण्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी मागणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे.