विटा : शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे स्थापन करण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीने मंगळवारी पुन्हा एकदा खानापूर येथील जागा पाहणी केली. या पाहणीनंतर समितीचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी सांगितले की, समितीच्या सदस्यांची मते सकारात्मक आहेत.
समितीने खानापुरातील गट नंबर ५७१/१ ही ४२ हेक्टर जागा तसेच त्याला लागून सध्या टेंभू योजनेच्या अखत्यारीत असलेली परंतु वापरात नसलेली गट नंबर ५७१/२ या जागेचीही पाहणी केली. या दोन्ही जागा उपकेंद्रासाठी योग्य असल्याचे समितीला वाटते.
समिती सदस्य वैभव पाटील म्हणाले, ताब्यातली ५७१/१ ची जागा शिवाय त्यापुढची ५७१/२ ची टेंभू आस्थापनाकडे असलेली साडेसहा एकरची जागा ही विद्यापीठाकडे घेण्यासंदर्भात प्रयत्न करणार आहोत. येत्या १९ जानेवारीच्या अधिसभेत प्रस्तावाला अंतिम रूप देण्यात येईल आणि ३१ जानेवारीपूर्वी राज्य शासनाकडे आम्ही तो पाठवू. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आत खानापूर येथील उपकेंद्राला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षाही आहे.
समितीचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील म्हणाले, सर्व सदस्यांशी चर्चा करून हा जागा पाहणी अहवाल शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीस सादर करू. या उपकेंद्रासाठी लागणारे सहकार्य खानापूर नगरपंचायत करत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात उपकेंद्र येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा केला जाईल. यासंदर्भात जो निर्णय आहे, तो लवकरात लवकर घेऊ.
समिती सदस्या मेघा गुळवणी म्हणाल्या, ही जागा पुन्हा एकदा आम्ही पाहिली. विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्यापासून खानापूरकडे जाताना उजव्या बाजूला पोसेवाडी तलावाच्या अलीकडे ही जागा खानापूर हद्दीत आहे. याठिकाणी मुबलक पाणी, दळणवळण आणि आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. शिवाय उपकेंद्राच्या प्रशासकीय आणि शैक्षणिक गोष्टींसाठी आवश्यक सुविधा मिळू शकतील.