शेखर इनामदार, दिनकर पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, नीता केळकर यांची भेट
सांगली : भाजपचे नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत भाजपमधील नाराजांचे 'पॅचअप' केले. भाजपचे नेते शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, नीता केळकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी सर्वांनी नाराजी सोडून भाजप-महायुतीचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली.सांगली विधानसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केले होते. त्यामुळे भाजपमधून विधानसभेसाठी शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, दिनकर पाटील, शिवाजी डोंगरे, माजी आमदार नितीन शिंदे, धीरज सूर्यवंशी, प्रकाश ढंग, नीता केळकर, अॅड. स्वाती शिंदे हे इच्छुक होते. पण वरिष्ठ नेत्यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. त्यामुळे काही इच्छुक नाराज झाले.
सांगली : भाजप नेते शेखर इनामदार यांना प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र देताना भाजपचे ज्येष्ठ नेते उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील. यावेळी उपस्थित सुधीर गाडगीळ, दीपक शिंदे, पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, प्रकाश ढंग.
चंद्रकांत पाटील यांनी सकाळी साडेदहा वाजता भाजप नेते शेखर इनामदार यांची निवासस्थानी भेट घेतली. सुमारे अर्धा तास चर्चा झाली. तेथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षासाठी इनामदार यांनी घेतलेली मेहनत वाया जाणार नाही, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. त्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी माजी आमदार दिनकर पाटील यांची सांगलीवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली.पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, नीता केळकर, माजी आमदार नितीन शिंदे यांचीही पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, उपाध्यक्ष शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी चंद्रकांत पाटील यांना भेटणे टाळले मंत्री पाटील म्हणाले,राजकारणात संयम, सबुरी महत्त्वाची आहे. भाजप हा पक्ष कधीही फुटला नाही. मला पक्षाने कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी दिली. त्यावेळी माझ्यावर टीका झाली. पण पक्ष विचलित झाला नाही. सर्वांनी संयम बाळगला. माझा विजय झाला. मी आमदार आणि मंत्री झालो. राजकारणात संयम महत्त्वाचा असून कामाला लागा, सांगलीत भाजपचा विजय निश्चित आहे.
गाडगीळ यांचे 'ते' नाटक नव्हते..!
चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे आमदार सुधीर गाडगीळ यांनी जाहीर केले, ते नाटक नव्हते. त्यांच्या मनाला वाटले म्हणून त्यांनी तसा निर्णय घेतला. मात्र केंद्र, राज्यातील भाजपच्या नेतृत्वाने सांगलीतून निवडणूक लढवण्यासाठी गाडगीळ यांना आग्रह केला. सर्व सर्व्हे रिपोर्टमध्येही गाडगीळ हेच पुढे होते. त्यामुळे गाडगीळ यांना निवडणूक लढवावी लागत आहे. अगोदर लढणार नाही, असे म्हटले असताना आता लढण्यास का तयार झाले, असा नाराजीचा मुद्दा करणे चुकीचे आहे.
जरांगे यांनी खऱ्याला खरे, खोट्याला खोटे म्हणावे
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात टिकले. ते आरक्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या काळात गेले. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे हे जे जे मागणे मांडत आहेत, त्यातील योग्य मागणे मान्य करत आहोत. तरीही ते समजून घेत नसतील, तर मात्र मराठा समाज समजून घेईल. मनोज जरांगे यांना मराठा समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. तो टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणावे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत म्हटले.