एलईडी व्हॅनला अजित पवारांनी दाखवला झेंडा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती असलेल्या एलईडी व्हॅनला झेंडा दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणूक प्रचाराचा आरंभ केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या विधानसभा मतदारसंघांत प्रचार मोहिमेची सुरुवात झाली आहे. या एलईडी व्हॅनच्या माध्यमातून महायुती सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना दिलेला लाभ, शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलेली वीज माफी, मोफत तीन गॅस सिलिंडरची योजना, मुलींच्या शिक्षणाचा शंभर टक्के खर्च उचलण्याचा क्रांतिकारी निर्णय इत्यादी योजना आम्ही मतदारापर्यंत पोचवणार आहोत. राष्ट्रवादीचे खजिनदार आमदार शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आदी नेते यावेळी उपस्थित होते.