खा. धनंजय महाडिक यांचा महिलांना इशारा
कोल्हापूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत अथवा सभेत दिसल्या, तर त्यांचे फोटो काढा. नावे लिहून घ्या आणि आमच्याकडे पाठवा. त्यांची व्यवस्था करू, असा इशारा भाजपचे खा. धनंजय महाडिक यांनी एका प्रचारसभेत दिला. महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. खा. महाडिक यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ विरोधकांनी व्हायरल केला आहे. खा. महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या रॅलीत अथवा सभेत दिसल्या की त्यांचे फोटो काढा. त्यांची नावे लिहून घ्या आणि आमच्याकडे पाठवा. आम्ही त्याची व्यवस्था करू. खायचे आमच्या सरकारचे आणि गायचे त्यांचे, हे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मन दुखावले असेल, तर माफी मागतो : खा. महाडिक
या वक्तव्याबद्दल खा. महाडिक यांनी दिलगिरी व्यक्त केली. आपले वक्तव्य कोणत्याही माता-भगिनीचा अपमान करण्यासाठी नव्हते, तरीही कुणाचे मन दुखावले असेल, तर त्यांची माफी मागतो, असे पत्रक खासदार धनंजय महाडिक यांनी काढले आहे. लाडकी बहीण योजना ही केवळ महायुती सरकारमुळेच यशस्वी झाल्याचे नमूद करताना अनवधानाने हे वक्तव्य केले. मी आयुष्यात महिलांचा नेहमीच सन्मान करत आलो आहे. मी माझ्या पत्नीमार्फत भागीरथी महिला संस्थेतर्फे महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी सकारात्मक काम करत आलो आहे आणि यापुढेदेखील करत राहीन. मन दुखावलेल्या माझ्या भगिनी मला मोठ्या मनाने माफ करतील, असे पत्रकात म्हटले आहे.