ठाणे :
कल्याण पूर्वमधील मंगलराघो नगर परिसरात मंगळवारी दुपारी सप्तशृंगी नावाच्या चारमजली इमारतीतील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळून एका चिमुकलीसह ७ जणांचा मृत्यू झाला. यामागील कारण समोर आलेले नाही. या दुर्घटनेत
किमान आठजण जखमी झाले. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
ही इमारत ४० वर्षे जुनी असून, त्यामध्ये २५ कुटुंबे राहात होती. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर डागडुजीचे काम सुरू असताना दुपारच्या सुमारास या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळून थेट तळमजल्यावर आदळला. मृतांमध्ये ४ महिला, २ पुरुष आणि एका अडीच वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. आठ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. यापैकी ७जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही काही रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख अजून पटलेली नाही.