पुणे :
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ, दूरदर्शी, विज्ञानाचे पुरस्कर्ते डॉ. जयंत विष्णू नारळीकर (वय ८६) यांचे मंगळवारी (दि. २०) पुण्यातील पाषाणमधील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय विज्ञानातील एका असाधारण अध्यायाचा अंत झाला, अशा प्रतिक्रिया देश-विदेशातून व्यक्त झाल्या. बुधवारी (दि. २१) पुण्यातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील,
डॉ. नारळीकर यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीत त्यांनी विश्वविज्ञानात
अभूतपूर्व योगदान दिले. प्रचलित वैज्ञानिक रुढीवादाला आव्हान देत विज्ञान व्यापक करीत लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतःला समर्पित केले. आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षतेला पर्याय असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या हॉएल-नारळीकर सिद्धांताचा व्यापकपणे स्वीकारल्या जाणाऱ्या बिग बैंग मॉडेलला धाडसी विरोध करणाऱ्या विश्वाच्या स्थिर स्थिती सिद्धांताचे समर्थन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
कोल्हापूर, वाराणसी ते केंब्रिज विद्यापीठ १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरमध्ये डॉ. नारळीकर यांचा जन्म एका शैक्षणिक क्षेत्रात रमलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ज्ञ होते. त्यांची आई सुमती नारळीकर या संस्कृत भाषेच्या अभ्यासक होत्या.