नेत्यांचा मुंबईत तळ : कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता : यादीकडे लक्ष
कोल्हापूर : निवडणुकीसाठी विधानसभा महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी चढाओढ सुरू असून, उमेदवारीसाठीही इच्छुकांनी देखील जोरात फिल्डिंग लावली असून, त्यासाठी नेते मुंबईत तळ ठोकून आहेत. आतापर्यंत भाजपने आपली अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीमधील अन्य पक्ष व महाविकास आघाडीतील पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली, तरी महायुतीमधील घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील जागा वाटपाची चर्चा अद्याप पूर्ण झालेली नाही. एकमेकांच्या जागेवरील हक्क सोडण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे चर्चा लांबत चालली आहे. अशी परिस्थिती असताना मतदारसंघामध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आज एखादा मतदारसंघ पक्षाला निश्चित केला, तर त्यावर राजकीय पक्षाचे नेते उद्या ठाम राहतीलच असे नाही. त्यामुळे काही इच्छुकांनी शेवटच्या टप्प्यात थेट 'वर्षा'वर धडक मारत आपले नाव चर्चेत आणण्याचे प्रयत्न केले आहेत.
जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी कोल्हापूर उत्तर, चंदगड, शिरोळ, राधानगरी हे विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावेत, यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात रस्सीखेच सुरू आहेत. महायुतीमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. कोल्हापूर उत्तर व हातकणंगले या दोन मतदारसंघांवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोघांनीही दावा केला आहे. महायुतीमध्ये असणाऱ्या जनसुराज्य शक्ती पक्षाने देखील हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. करवीर विधानसभा मतदारसंघावर देखील जनसुराज्य शक्ती पक्षाने दावा केला असून, त्यांच्या उमेदवाराने प्रचार देखील सुरू केला आहे.
जास्तीत जास्त मतदारसंघ मिळवण्यासाठी नेते आग्रही
उमेदवारी मिळावी म्हणून शेवटच्या टप्प्यात नेत्यांनी उचल खाल्ली असून, जास्तीत जास्त मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी आग्रही आहेत. त्याकरिता मुंबईत त्यांनी तळ ठोकला आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी यावेळी प्रचाराला वेळ कमी मिळणार आहे, असे असताना मतदारसंघ आणि उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे आणि इच्छुकांच्या नावामध्ये प्रत्येक मतदारसंघात नावांची कमी- अधिक प्रमाणात भर पडत असल्यामुळे कार्यकत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याने त्यांचे यादीकडे लक्ष लागून राहिले आहे.