हल्ला काँग्रेसवर... शरद पवार निशाण्यावर

Online Varta
0

 

संभाजीराजे यांच्या भूमिकेने जिल्ह्यात महाविकास आघाडीला धक्का


कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शब्द देऊनही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यामुळे संतप्त झालेल्या संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात तलवार उपसली आहे. तिसऱ्या आघाडीच्या बैठकीत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला असला तरी संभाजीराजे यांच्या निशाण्यावर शरद पवारच असल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे त्यांची भूमिका जिल्ह्यात महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी ठरणार आहे. आपल्याला शब्द देऊन शाहू महाराज यांना उमेदवारी दिली, यामागे शरद पवार यांचे राजकारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे काँग्रेसवर हल्ला चढवणाऱ्या संभाजीराजे यांच्या निशाण्यावर शरद पवार असल्याची चर्चा आहे.




कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर मुळात राष्ट्रवादी काँगेसचा हक्क होता. १९९९ नंतर येथून कॉंग्रेस पक्षाने एकदाही निवडणूक लढविली नव्हती. मात्र महाविकास आघाडी राज्यात २०१९ साली सत्तेवर आल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. या बदलत्या समीकरणात कोल्हापूरची जागा जिंकायची असेल तर उमेदवार तगडा हवा या चर्चेतून शाहू महाराज यांचे नाव पुढे आले. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नावाची चर्चा होती. मात्र महाविकास आघाडीकडून शाहू महाराज यांचे नाव पुढे येताच त्यांचे स्थान लक्षात घेऊन पक्ष निवडीचे स्वातंत्र्य शाहू महाराज यांना देण्यात आले व त्यांनी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली. त्यापूर्वी ज्या राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीने राज्यात सत्तांतर घडविले, त्यातील राज्यसभा निवडणुकीत ती जागा शिवसेनेची होती. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची उमेदवारी घेण्यास नकार दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपल्याला मान्य नसल्याची ठाम भूमिका शिवसेनेने घेतली होती. त्यातूनच शाहू महाराज यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले व शाहू महाराज यांनी त्याला मान्यताही दिली. त्यामुळे तयारी करूनही उमेदवारी न मिळाल्याने संभाजीराजे यांचा हिरमोड झाला हे लपून राहिले नाही. 
         नाशिकहून आलेल्या संभाजीराजे समर्थकांच्या मोटारींवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख संभाजीराजे यांचा करण्यात आला होता. मात्र त्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले. आता लोकसभेच्या निवडणुकीतील हिशेब चुकता करण्याची उत्तरपूजा संभाजीराजे यांनी मांडण्याचे ठरविल्याचे दिसते. पुण्यातील बैठकीनंतर त्यांनी शाहू महाराज यांच्या विजयानंतर मविआशी आपला संबंध संपल्याचे जाहीर केले. काँग्रेसने सत्काराच्यावेळी आपल्याला का बोलविले नाही, असा प्रश्न उपस्थित करत लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्या निवडणुकीत एका मुलाची जबाबदारी काय असते, ती पूर्ण केल्याचेही आवर्जून सांगितले. आता संभाजीराजे यांनी तलवार उपसली आहे. त्या तलवारीने ते कितीजणांना जायबंदी करतात ते पाहावे लागेल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top