भाजपने उमेदवारी दिली तरच लढणार : खा. महाडिक
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले कृष्णराज महाडिक हे शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सोमवारी अचानकपणे सुरू झाली. मात्र, भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी त्याचा इन्कार केला.
आम्ही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे, त्यांनी उमेदवारी दिली तरच लढू, असे सांगितले. त्यामुळे सायंकाळी या चर्चेला पूर्णविराम मिळाला. कोल्हापूर उत्तरमधून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. महायुतीतील शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांत उमेदवारीसाठी चुरस आहे.
कृष्णराज महाडिक यांच्यासह अन्य तीन, चार उमेदवार भाजपकडून इच्छुक आहेत, तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिंदे गटाकडून या मतदारसंघातून लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अचानकपणे सोमवारी धनंजय महाडिक यांच्यासह कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवास्थानी भेट घेऊन शिंदे गटाकडून लढण्याची तयारी दाखविली, अशा बातम्या सुरू झाल्या. यासंदर्भात धनंजय महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण 'वर्षा'वर गेलो नाही. त्यामुळे या चर्चेत काही तथ्य नाही. भाजपकडून उमेदवारी मागितल्याने जागा वाटपात ही जागा भाजपला मिळाली, तर कृष्णराज लढतील, असेही ते म्हणाले.