![]() |
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमदार सुमन ताई पाटील यांचे विधानभवनावर आंदोलन |
अवकाळी पावसाने तासगाव आणि कवठेमहांकाळसह जिल्ह्यात द्राक्षशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच्या पार्श्वभूमीवर आमदार सुमन पाटील यांनी नागपूर येथे विधानभवनाच्या पायऱ्यावर ठिय्या मारून आंदोलन केले. त्यांच्यासमवेत आमदार रोहित पवार, रफी जितेश अंतपूरकर, उदयसिंग राजपूत, शिरीष चौधरी, प्राजक्त तनपुरे सहभागी झाले होते. आमदार श्रीमती सुमन पाटील यांनी मंगळवारी (ता. १२) विधानसभेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पाढा वाचून एकरी एक लाख रुपये भरपाई आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे.
आज विधान भवनाच्या पायरीवर तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील अवकाळी पावसाने सडलेली कुजलेली द्राक्ष घेऊन सरकारने उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. प्रसार माध्यमांसमोर नुकसान झालेली द्राक्ष ठेवली. आमदार रोहित पवार यांनी, 'सुमनताई बोलत आहेत, मात्र सरकार यावर काही बोलायला तयार नाही. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,' अशी मागणी केली. नुकसानग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी प्रसंगी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू, अशी प्रतिक्रिया याबाबत आमदार सुमन पाटील यांनी व्यक्त केली. सरकार याकडे ललक्ष देण्यास तयार नाही, असा आरोप त्यांनी केला. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करून पळून जाणाऱ्या दलालाबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी केली.