कोल्हापूर खंडपीठ मागणीला मूर्त रूप मिळावे, यासाठी १५ ऑगस्टपूर्वी कोल्हापुरात सहा जिल्ह्यांतील वकिलांची परिषद आयोजित करण्याचा ठराव खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. दरम्यानच्या काळात सहा जिल्ह्यांत आंदोलनाची तीव्रता वाढवून याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. तसेच कोल्हापूर आणि सातारा येथील दोन्ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन खंडपीठ मागणीचे निवेदन द्यावे, यासाठी प्रयत्न करण्याची सूचना उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी कृती समितीला केली.
कोल्हापुरात सहा जिल्ह्यांतील वकिलांची परिषद घेण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. त्या अधिवेशनात आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे. दरम्यानच्या काळात आंदोलन तीव्र करण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवेदन देणे, आमदारांमार्फत अधिवेशनात आवाज उठवणे, पक्षकारांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांनी कृती समितीला मार्गदर्शन केले, तसेच महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड. वसंतराव भोसले, ज्येष्ठ वकील डी. एम. जगताप, अॅड. श्रीकांत जाधव, अॅड. संभाजीराव मोहिते, अॅड. महादेवराव आडगुळे आदींनी सूचना मांडल्या. अॅड. रणजित देसाई, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. विकास पाटील, अॅड. किरण रजपूत, अॅड. बाळासाहेब गायकवाड, आदींनी मनोगत व्यक्त करून खंडपीठ आंदोलनाला सक्रिय पाठिंबा व्यक्त केला, सचिव निशिकांत पाटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक तथा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.