महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
विरोधकांकडून जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आले. खोटे बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला. आपण गाफील राहिलो त्यामुळे निवडणुकीत मार पडलाय, मात्र आता गाफील राहून चालणार नाहीत. विरोधक काय खोटा प्रचार करायचा तो करोत. महायुती म्हणून एकत्र निवडणुकीला सामारे जायचे असून तुम्ही मागील दोन वर्षांत सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी कार्यकर्त्यांना केले.
महायुतीच्या वतीने माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की सरकारने सर्वांसाठी अनेक योजना राबविल्या. या अर्थसंकल्पात योजना जाहीर झाल्यानंतर तर विरोधकांचे चेहरे पांढरेफटक पडले. योजनांचा बॉम्बच त्यांच्यावर पडल्याने ते कावरेबावरे झाले. सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे हे सरकार आहे, हे जनतेला पटवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.