आम्ही देशभर मेट्रोचे जाळे विणले : पंतप्रधान मोदी
थेट विमानसेवेमुळे जगभरातील विठ्ठलभक्त पंढरीत येतील
पुणे : पुढारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दिल्लीतून आभासी पद्धतीने (ऑनलाईन) महाराष्ट्रातील सुमारे ११ हजार २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन कळ दाबून झाले. हा कार्यक्रम पुण्यातील सारस बागेसमोरील गणेश कला क्रीडा केंद्राच्या भव्य सभागृहात झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, महायुती सरकारमधील मंत्री उपस्थित होते. राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आभासी पद्धतीने उपस्थित होते. देशात २०१४ मध्ये आमची सत्ता आल्यानंतर पुण्यासह देशभरात आम्ही मेट्रोचे जाळे विणले. त्यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना मेट्रो प्रकल्पाचा साधा खांबही उभारता आला नाही.
पुणे: पुणे दिल्लीतून आभासी पद्धतीने महाराष्ट्रातील विकासकामांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सहभागी झाले.
पुणे , संभाजीनगर, सोलापुरातील या विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन
• शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे लोकार्पण (३.६ किमी)
• स्वारगेट ते कात्रज या नवीन भुयारी मार्गाचे भूमिपूजन (५.४ किमी)
• पुण्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली शाळा व भिडे वाड्याचे भूमिपूजन
• सोलापूर विमानतळाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन
• छत्रपती संभाजीनगरजवळच्या बिडकीन येथील उद्योग वसाहतीचे लोकार्पण
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लुटला मेट्रो प्रवासाचा आनंद
पुणे: आत्तापर्यंत केवळ भूमिपूजन होत होते. मात्र कामे होत नव्हती. आम्ही घोषणा केली, भूमिपूजन केले आणि कामही वेगाने सुरू केले आहे. मेट्रोमुळे वाहतूक कोंडीतून सुटका होऊन पुणेकरांचे 'ट्रॅफिकमुक्त पुणे' हे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. मेट्रोचा प्रवास एकदम भारी, गतिमान आणि आरामदायी आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद लुटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मेट्रो मार्गाचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी मेट्रोतून प्रवास करण्याचा अनुभव घेतला. या वेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, चंद्रकांत पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते
पंतप्रधान मोदी संवेदनशील, विरोधक दुटप्पी : मुख्यमंत्री शिंदे
पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी पुण्यात येणार होते. मात्र, त्यांचा दौरा रद्द झाल्याने मेट्रो २६ सप्टेंबरला सुरू होऊ शकली नाही आणि विरोधकांनी आंदोलन केले. याबाबत शिंदे म्हणाले, आपले पंतप्रधान संवेदनशील आहेत. मुसळधार पावसात पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये आणि पुणेकरांना कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी उद्घाटन पुढे ढकलले. त्याचप्रमाणे मेट्रोची आवश्यकता लक्षात घेऊन तातडीने लोकार्पण केले. ही संवेदनशीलता विरोधकांमध्ये नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण दिसते आणि दुटप्पी भूमिका घेतात. त्यांनी आरोप करत राहावेत, आम्ही काम करत राहू.
लाडक्या बहिणींशी साधला संवाद
स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्गावर पहिली मेट्रो रवाना झाली. या वेळी लाडक्या बहिणींसह विद्यार्थिनींनी पहिल्या मेट्रोतून सफर केली. त्यानंतर दुसऱ्या मेट्रोमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास केला. अवघ्या ७ मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण झाला. सिव्हिल कोर्ट स्टेशनवर मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला.