शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी; इतर पक्षांची मात्र अशी मागणी नाही
मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका एकाच टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदेसेना आणि अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली. कमी टप्प्यात मतदान घ्या, अशी उद्धव सेनेचीही मागणी आहे. उद्धवसेना, काँग्रेस, शरद पवार गट किंवा भाजपने मात्र अशी कोणतीही मागणी आयोगाकडे केली नाही. यासंदर्भात आयोगाने ठरवावे, अशी पक्षाची भूमिका असल्याचे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 'लोकमत'ला सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली पथक मुंबईत दाखल झाले असून या पथकाने शुक्रवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या. लोकसभा निवडणूक कमी टप्प्यात घेण्याची मागणी त्यावेळी काँग्रेसने केली होती. मात्र, आयोगाने हा आपला अधिकार असल्याचे उत्तर दिले होते. त्यामुळे यावेळी आमच्या पक्षाने यासंदर्भात मागणी केली नसून निवडणुका वेळेवर घ्या, अशी मागणी केल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकमी यांनी 'लोकमत'ला सांगितले. तर निवडणुका शक्य तितक्या कमी टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी उद्धव सेनेतर्फे सुभाष देसाई यांनी केली.