शिवरायांचे विचार संविधानात; ते टिकविण्याची जबाबदारी आपली
राहुल गांधी : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे शानदार अनावरण
रायगड किले पर जरूर आऊंगा : राहुल गांधी शाहू समाधी स्थळाला अभिवादन कोल्हापूर : शाहू समाधी स्थळाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट देऊन शाहू महाराज यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हर्षल सुर्वे यांनी रायगड गडाला भेट देण्याची विनंती केली तेव्हा 'रायगड किले पर जरूर आऊंगा', असे आश्वासन दिले.
अपूर्व उत्साह आणि शानदार सोहळ्यात या पुतळ्याचे अनावरण शनिवारी सकाळी ११.२० वाजता राहुल गांधी यांच्या हस्ते रिमोटद्वारे झाले. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हा भव्य पुतळा साकारला आहे. मान्यवरांचे स्वागत डी. वाय. पाटील ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांनी केले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरणाचा कार्यक्रम शुक्रवारी होणार होता. परंतु विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल माफी मागतो, असे म्हणत राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची जिल्हा काँग्रेसच्या वतीने जय्यत तयारी केली होती. राज्य पातळीवरील नेते देखील कोल्हापुरात सकाळपासून दाखल होत होते. यामध्ये महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, आ. बाळासाहेब थोरात, आ. भाई जगताप, आ. विश्वजित कदम, आ. नसीम खान, माणिकराव ठाकरे आदींचा समावेश होता. चार वाजता राहुल गांधी विमानाने कोल्हापुरात येणार होते. म्हणून त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील, खा. शाहू महाराज यांच्यासह सर्व नेते विमानतळावर गेले होते. परंतु सव्वापाचच्या सुमारास त्यांना विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कसबा बावडा येथे कार्यक्रमासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.कार्यक्रमाच्या ठिकाणचा उत्साह ओसंडून वाहत होता. शाहीर आपल्या शाहिरीतून उपस्थितांमध्ये पोवाड्याद्वारे चैतन्य निर्माण करत होते. विद्युत रोषणाईने परिसर झळकू लागला होता. इतक्यात राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्याची चर्चा सुरू झाली. निवेदकाने पुतळा समितीच्या सर्व सदस्यांना बोलावून घेतले. व्यासपीठासमोर गर्दी झाली. त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती तोपर्यंत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील व्यासपीठावर आले. विमानामधील तांत्रिक बिघाडामुळे राहुल गांधी यांचा दौरा रद्द झाल्याचे आ. सतेज पाटील यांनी सांगताच शांतता पसरली. राहुल गांधी शनिवारी सकाळी कोल्हापुरात दाखल होणार आहेत. त्यांच्याच हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी सकाळी १० वाजता करण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी जाहीर केले. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला तसेच राज्य पातळीवरील नेते उपस्थित होते. दरम्यान, राहुल गांधी यांचे सकाळी दहा वाजता विमानाने कोल्हापुरात आगमन होईल. तेथून ते कसबा बावड्याकडे रवाना होतील. भगवा चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होईल. त्यानतंर शाहू समाधी स्थळास भेट देऊन ते अभिवादन करतील.