पंतप्रधान : महाराष्ट्रासाठी ७,६०० कोटी खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन
नवी दिल्ली : राजकीय फायद्यासाठी हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हरियाणातील जनतेने नाकारलेले आहे. महाराष्ट्रातही अशा शक्तींना आगामी विधानसभा निवडणुकीत जनता अस्मान दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रात ७,६०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. पंतप्रधान म्हणाले, आजपर्यंत एकाही काँग्रेस नेत्याने आपल्या मुस्लिम बांधवांमध्ये किती जाती आहेत, हे सांगितलेले नाही. मुस्लिमांचा विषय आला की, काँग्रेसच्या नेत्यांची दातखीळ बसते. तोंडाला ते कुलूप लावून बसतात; पण जेव्हा जेव्हा हिंदू समाजाचा प्रश्न येतो तेव्हा काँग्रेस पक्ष जातीवरून चर्चा सुरू करतो, भांडणे लावतो. काँग्रेस पक्ष मुस्लिमांच्या मनात नाहक भीतीचे वातावरण निर्माण करतो.
काँग्रेस आपल्या व्होट बँकेसाठी देशाचे जातीयीकरण करत आहे. मुस्लिमांना घाबरवत राहा, त्यांना भीती दाखवा, त्यांचे मतपेढीत रूपांतर करा आणि आपली व्होट बँक मजबूत करा, हे काँग्रेसचे सूत्र स्पष्ट असल्याची टीका मोदी यांनी केली. एकजूट, सशक्त आणि विकसित भारतासाठी हरियाणाच्या जनतेने भाजपला कौल दिला आहे. महाराष्ट्रातील जनताही हिंदूंमधील जाती-जातींमध्ये मतभेद निर्माण करू पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल, असे ते म्हणाले. हिंदूंची एक जात दुसऱ्या जातीशी लढावी, हा काँग्रेसचा हेतू आहे. जितके हिंदू विभाजित होतील, तितका आपला फायदा होईल हे काँग्रेसला माहीत आहे. काँग्रेसला हिंदू समाज कोणत्याही प्रकारे पेटवत ठेवायचा आहे, भारतात जिथे जिथे निवडणुका होतात तिथे काँग्रेस पक्ष हेच सूत्र लागू करतो.वाढवण बंदर, मराठीला अभिजात भाषा म्हणून दिलेला दर्जा या केंद्र सरकारच्या कामांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे कोट्यवधी मराठी बांधवांचे स्वप्न साकार झाले आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना मोठा लाभ शिर्डी विमानतळाच्या मालवाहू विमानसेवेचा शेतकऱ्यांना फायदा होईल. शिर्डी, लासलगाव, अहिल्यानगर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांना कांदा, द्राक्ष, पेरू आणि डाळिंब यासारखी उत्पादने मोठ्या बाजारपेठेत सहज पोहोचवता येतील. कार्गो कॉम्प्लेक्स त्यांच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
काँग्रेसबद्दल हे बोलले पंतप्रधान
• 'सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय' ही भारताची सनातन परंपरा आहे, ती दडपण्याचे कार्य काँग्रेसकडून चाललेले आहे.
• काँग्रेसने नेहमीच फूट पाडा आणि सत्ता मिळवा हे सूत्र पाळले आहे. काँग्रेस हा बेजबाबदार पक्ष असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
'या ' कामांचे नूतनीकरण, पायाभरणी, उद्घाटन
- नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नूतनीकरण
- शिर्डी विमानतळावरील नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी
- महाराष्ट्रातील १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन
- भारतीय कौशल्य संस्था, विद्या समीक्षा केंद्राचे उद्घाटन
१० सरकारी वैद्यकीय महाविद्यालये कुठे?
- मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वाशिम, भंडारा, हिंगोली आणि अंबरनाथ (ठाणे) या १० ठिकाणी नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये होत आहेत.
- नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागा तयार होतील. राज्यातील एकूण वैद्यकीय जागांची संख्या सुमारे ६ हजार होईल.