मुख्यमंत्री शिंदे; कोल्हापुरातील ४, २०० कोटींच्या विविध कामांचा प्रारंभ
कोल्हापूर : महायुतीचे सरकार घेणारे नाही, तर जनतेला देणारे सरकार आहे. पूर्वीचे सरकार हप्ते घेत होते, आमचे सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीज म्हणून हप्ते टाकत आहे. याच बहिणींना आता आम्हाला लखपती बनवायचे आहे. यामुळे हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करा आणि पुन्हा महायुतीलाच साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ऐतिहासिक दसरा चौकात केले. कोल्हापूर शहरातील ४ हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते झाला. पावसात झालेल्या या कार्यक्रमाला महिला, नागरिकांची गर्दी होती.
कोल्हापूर : दसरा चौक येथे आयोजित केलेल्या विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
अडीच वर्षांतील महाविकास आघाडी सरकारचे काम बघा आणि दोन वर्षांतील महायुतीच्या सरकारचे काम बघा. लाडक्या बहिणींचे खाते बंद करण्यासाठी निघालेल्यांना बरोबर लक्षात ठेवा, असे आवाहन करत, लाडक्या बहिणींना या योजनेवरून बदनाम करण्याचा प्रयत्न केला, जे लोक म्हणतात, ही योजना फसवी आहे, ती बंद पडणार. त्यांना माता-भगिनींच्या तोंडातील घास काढून घेऊन काय मिळणार आहे? असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. यापूर्वी योजना नव्हत्या का? लाभार्थी नव्हते का? लाभार्थी होते; मात्र कटकटी नको म्हणून अनेकजण लाभ सोडून देत होते. कारण, त्यावेळी देणारे सरकार नव्हते, माझे काय? म्हणणारे होते; पण आता हे देणारे सरकार आहे. सर्वसामान्यांत जाऊन काम करणारे सरकार आहे.
खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्तीशी बोलणे झाले आहे
खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्तीशी आपले बोलणे झाले आहे, असे सांगत रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे काम केले जाईल, आयटीआय पार्कसाठी जमीन दिली जाईल, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केले जाईल, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.